Moshi Accident : शिवसेनेचे आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आक्रमक

पिंपरी – मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांसाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी शिवेनेचे गटनेते विश्वजित बारणे, उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे व कार्यकर्ते उपस्थित होते. आयुक्त कार्यालयात जमलेल्या आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कचरा डेपोतील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, आयुक्त म्हणत आहेत ही नैसर्गिक आपत्ती आहे. मात्र, याआडून ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. ५० तास झालेले असतानाही किती लोक आतमध्ये आहेत हे त्यांना सांगता येत नाही.
नियमांचे उल्लंघन झाले आहे. २० मीटर इतकी कचऱ्याची उंची असताना शेकडो मीटर उंच डोंगर होत असताना हे अधिकारी झोपले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. निष्पाप लोकांच्या जिवावर बेतले आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. त्यांची उच्चस्तरीय चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा ही आमची प्रमुख मागणी आहे.





