कल्याण : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा वाद पेटला आहे. शिवसैनिकांनी कुणाल कामराचा ज्या ठिकाणी शो झाला होता, त्या स्टुडिओची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने भर रस्त्यावर चांगलंच चोपलं आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
कल्याण पश्चिमेमध्ये ही घटना घडली आहे. राणी कपोते असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला होता.
त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. यावेळी रस्त्याचा कामाच्या श्रेयवादावरून वाद झाला. कामाचा पाठपुरावा आपण केला, असा दावा राणी कपोते यांनी केली होता. त्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटामध्ये जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला. यामुळे काही काळ त्याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आज दुपारी अहिल्याबाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले पुन्हा एकदा आमने – सामने आले. तेव्हा राणी कपोते यांनी ‘तू मला शिव्या का देतो? माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो’ असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात उगले यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राणी कपोते यांनी उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.