नवनीत राणा प्रकरणी शिवसेनेने रुग्णालयाला धरले धारेवर; तपासणीच्या व्हिडीओवरून उपस्थित केले प्रश्न

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेने धडक कारवाईचा चंग बांधला असल्याचे दिसत आहे. कारण, तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
याच मुद्द्यावरून शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग आणि फोटो कसे काढले गेले? रुग्णलायाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत. असे म्हणत रुग्णालय प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीच केली.
रुग्णालयात फोटोग्राफी आणि शुटींग करण्यासाठी कोणी दबाव आणला आहे का? याचा तपास झाला पाहिजे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना दिली.





