Pune District : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोडेगावात उबाठा शिवसेनेचे आंदोलन

घोडेगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरनिहाय ५० हजार रुपये अनुदान मंजूर करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, बँक वसुली थांबवावी व नुकसानभरपाई तातडीने द्यावी. या मागणीसाठी बुधवार, दि.८ रोजी सकाळी साडेदहा वाजता घोडेगाव तहसील कार्यालय (ता.आंबेगाव) येथे आंदोलन पार पडले.
आंदोलनात उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर, जिल्हा संघटक राजाभाऊ बाणखेले, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन भालेराव, जिल्हा संघटक रोहन कानडे, शाखाप्रमुख हर्षल भालेराव ,उपशाखा प्रमुख प्रमोद पिंगळे,स्वप्निल भालेराव, सुभाष भालेराव, विनोद घुले, अजित मोरडे, दत्तात्रय खानदेशे, शीतल बागल, संजय थोरात, नंदकुमार बोऱ्हाडे, हेमंत एरंडे, भरत मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये झालेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून मातीही शिल्लक राहिली नाही. उभी असलेली पिके वाहून गेली आहेत, काही पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तसेच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली किंवा घरातच पडली आहेत. यामुळे शेतकरी कुटुंबांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी आणि त्वरित मदत मिळवण्यासाठी शासनाला ताकीद देण्यात आली.नायब तहसीलदार शांताराम किर्वे यांना निवेदन देण्यात आले.





