नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या कायदेशीर लढाईत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली. मात्र, या प्रकरणाची पुढील सुनावणी थेट 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली, ज्यात न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल विचारणा केली. यावेळी, ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी युक्तिवादासाठी २ तास तर डॉ. ए. एम. सिंघवी यांनी किमान ३ तास लागतील असे नमूद केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, कोर्टाने काही मुद्दे समान असू शकतात, असे सांगत सुनावणी पुढे ढकलली. २१ आणि २२ जानेवारी रोजी सलग सुनावणीचे संकेत – सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वाच्या प्रकरणासाठी २१ आणि २२ जानेवारी असे सलग दोन दिवस सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत. कोर्टाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्या पक्षाला (ठाकरे गट) युक्तिवादासाठी ३ तास आणि प्रतिवादींना (शिंदे गट) २ तास वेळ दिला जाईल. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने या तारखा निर्णायक ठरतील. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी ५ तासांच्या युक्तिवादानंतर निकाल येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत लोकशाहीची बूज राखणारा निर्णय येईल, अशी आशा व्यक्त केली आहे. बंड आणि निवडणूक आयोगाचा निर्णय – २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले होते. संख्याबळाच्या आधारावर त्यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले होते. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोर्ट या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करणार आहे. पुढील जानेवारीत होणाऱ्या दोन दिवसांच्या सलग सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून अंतिम निकाल देईल की तो राखून ठेवेल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.