कल्याण : कल्याण तालुक्यातील गोवेली गावचे रहिवासी असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची कल्याण मुरबाड रस्त्यावरील मामणोली गाव हद्दीत मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी शुक्रवारी निघृणपणे हत्या केली. किरण यांच्या हत्येमुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर किरण घोरड यांची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, किरण घोरड शुक्रवारी आपल्या वाहनातून गोवेली गावातून बाहेर पडले होते. कल्याण मुरबाड रस्त्यावर मामणोली गाव हद्दीतून जात असताना पाळत ठेऊन असलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. चार ते पाच जणांच्या टोळक्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीनं अटक करावी आणि हत्येचा उलगडा करावा, अशी मागणी केली आहे. या हत्याकांडामागील नेमकं कारण उलगडण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं कार्यरत आहेत. धागेदोऱ्यांवरून तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचं पोलिसांचं स्पष्ट मत आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.