Shivsena News : अकोला महापालिकेतील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत वाद चांगलाच पेटला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे (Shivsena News) महापालिका गटनेते सागर भारुका यांना बुधवारी झालेल्या राडा प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, भारुका यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकरण काय आहे? ३ दिवसांपूर्वी अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप आणि शिंदेसेना (Shivsena News) आमने-सामने आले होते. विकास कामांच्या दर्जावरून झालेल्या वादात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे गटनेते सागर भारुका यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. या घटनेमुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता. DCM Eknath Shinde Politics बैठकीत सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना १५ दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश दिले होते. या निलंबनानंतर दोन्ही पक्षांमधील तणाव अधिक वाढला होता. बुधवारी पुन्हा राडा विकोपाला निलंबनाच्या रागातून बुधवारी सागर भारुका यांनी पुन्हा महापालिकेत धुडघूस घातला. ते विजय अग्रवाल यांना मारहाण करण्यासाठी धावले. या वेळी शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक मंगेश काळे यांच्यासह त्यांनी गोंधळ घातला. भारुका यांनी अग्रवाल यांना शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात सागर भारुका यांच्याविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आज (गुरुवारी) सागर भारुका यांना अटक केली. दोन्ही बाजूंकडून तक्रारी सागर भारुका यांनीही विजय अग्रवाल यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेकडून (Shivsena News) राजेश साळवे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. महायुतीत तणाव वाढला या प्रकरणामुळे अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील समन्वयावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महायुतीतल्या दोन्ही पक्षांमधील ‘हमरी-तुमरी’ च्या घटनेमुळे स्थानिक स्तरावर राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेसेना या कारवाईमुळे आक्रमक झाली असून, पक्षाकडून जोरदार विरोध दाखवण्यात येत आहे.