गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं ! उद्या उमेदवारांची पहिली यादी होणार जाहीर

पणजी – महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, पण गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाण्यास कॉंग्रेसने नकार दिला आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढवणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी गोव्यात कॉंग्रेससोबत युती न झाल्याची माहितीही दिली, पुढील दोन दिवसांत उमेदरांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रफुल पटेल म्हणाले की, ‘महाराष्ट्राप्रमाणे कॉंग्रेसला गोव्यातही युती करण्याची आम्ही ऑफर दिली होती. याबाबत चर्चाही झाली. पण यामधून काहीही साध्य झाले नाही.
राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणूका लढवतील. सर्व 40 जागांवर आम्ही निवडणूका लढवणार नाही, पण महत्वाच्या जागांवर आम्ही उमदेवार उभे करणार आहोत. उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर काही दिवसानंतर दुसरी यादीही जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला युती हवी होती मात्र कॉंग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.





