शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

नवी दिल्ली – मूळची ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणुक चिन्हाच्या खऱ्या वारसदाराची लढाई आता अंतिम टप्प्याकडे वळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाने पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आपलाच हक्क असल्याचा लेखी युक्तीवाद आज निवडणूक आयोगापुढे सादर केला.
सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या शेवटच्या सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गटाला लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितले होते. दोन्ही गटाने 30 जानेवारीपर्यंत आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आदेश दिले होते.
शिंदे आणि ठाकरे गटाने आज आयोगापुढे मूळची शिवसेना आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर आपलाच अधिकार असल्याचा लेखी युक्तीवाद आयोगाकडे सादर केला आहे. कायद्याच्यादृष्टीकोणातून बघितलं तर आमचीच बाजू योग्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. तर शिंदे गटाने सुध्दा 124 पानाचा लेखी युक्तीवाद सादर केला आहे.
ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीची सविस्तर माहिती दिली आहे. शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी आहे. यामुळे मूळ पक्ष आणि निवडणूक चिन्ह या दोन्ही गोष्टीवर केलेला दावा अयोग्य असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले.
शिवसेना नेते अनिल परब म्हणाले की, पक्ष म्हणजे आमदार-खासदारांचा नसतो. तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष असतो. जवळपास तीन लाख पदाधिकारी आणि 20 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आले आहेत.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, आमदार-खासदारांना मिळालेली मते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिळाली आहेत. ही मते उमेदवारांच्या नावावर मिळाली नाहीत. उद्या, विधानसभेत एकच संख्याबळ असलेल्या पक्षाच्या आमदाराने पक्षांतर केले तर, त्याच्यासोबत संपूर्ण पक्ष गेला, असे म्हणणार का, असा प्रश्नही खासदार सावंत यांनी केला.
शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी उत्तर दाखल
निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्यास काही मिनिटांचा अवधी उरला असतानाच शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे आपला लेखी युक्तीवाद सादर केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे.





