दापोलीत शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रामदास कदम यांनी राज्य सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. यामुळे निवडणुकीआधीच महायुतीतील धुसफूस समोर येऊ लागली आहे. दापोली विधानसभा मतदार संघात रामदास कदम आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे.
दापोलीत शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्याकडून भाजपच्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा सतत होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भाजपने दापोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्रीराम इदाते आणि भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी रामदास कदम यांच्या भूमिकेचा निषेध करत आता दापोली विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांच्या मुलाच्या विरोधात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.





