Shiv Jayanti 2026 – छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते, तर स्वराज्य, लोककल्याण, न्याय आणि सुशासनाचे तेजस्वी प्रतीक होते, त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही आपल्याला आत्मसन्मान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान, शेतकरी आणि प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या याच मूल्यांची जोपासना करणे हीच आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच पी.एम.टी चौक भोसरी, लांडेवाडी चौक, पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स काॅलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक योगेश बहल, जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, लिपिक अभिजित डोळस यांच्यासह भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भक्ती शक्ती समूह शिल्प उद्यान, प्रेमलोक पार्क चिंचवड, थेरगाव येथील डांगे चौक, थेरगाव गावठाण, रहाटणी , पिंपरी वाघेरे गावठाण, कासारवाडी मनपा शाळा, दापोडी येथील दापौडी चौक, फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक संजय काटे, राजू बनसोडे, नगरसेविका माई काटे, सविता खुळे, अर्चना तापकीर , आरती चौंधे, प्रतिक्षा जवळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, अतुल पाटील आदी उपस्थित होते. मोहननगर, चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी निवेदीता घार्गे यांनी तर मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.