Shiv Jayanti 2026 – शिवजयंती महोत्सव समितीतर्फे यावर्षीही उद्या, गुरुवारी (दि. १९ फेब्रु.) सकाळी नऊ वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणुकीचे हे सलग १४ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. मिरवणुकीचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर हे आमदार तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, जेष्ठ विधीज्ञ ॲड. प्रताप परदेशी उपस्थित रहाणार आहेत.भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या ५१ रणरागिणींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिणी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक, ५१ रणशिंग पथके सहभागी होणार आहेत. शिवजयंती महोत्सव समितीचे युवा सदस्य ईशान गायकवाड एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत हेलिकॉप्टरमधून सलग १५ व्या वर्षी पुष्पवृष्टी करणार आहेत.