Shirwade dam accident – राजमाची परिसरातील शिरवदे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांपैकी दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये करण ठोंबरे (वय २०) आणि आर्या बंडावार (वय २०) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सुजल पवार (वय १९) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुजल पवार आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी राजमाची किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये करण ठोंबरे, आर्या बंडावार, आस्था टेंबरे, सृष्टी गवाडे आणि ज्योत्सना शेळके यांचा समावेश होता. राजमाची परिसरात पोहोचल्यानंतर सर्वांनी शिरवदे धरणाच्या बॅक वॉटर परिसरात जाण्याचे ठरवले. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास सर्वजण धरण परिसरात थांबले असताना आर्या बंडावार आणि ज्योत्सना शेळके पुढे गेल्या. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आर्या पाण्यात बुडू लागली. ज्योत्सना हिने मदतीसाठी आरडाओरडा केला. हे पाहून करण ठोंबरे तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र त्यालाही पोहता येत नसल्याने तोदेखील पाण्यात अडकला. मित्रांसह स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. डायल १०० वर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि पर्यटकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार लबडे करीत आहेत.