पुणे जिल्हा | शिरूरचा ठेकेदार अखेर नमला

शिरूर, (वार्ताहर)- शिरूर पंचायत समिती येथील बीओटी प्रकल्पातील गाळा नावावर करण्यासाठी सिमा गिरमकर या महिलेने पंचायत समितीसमोरील उपोषण त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने व ठेकेदाराने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले आहे.
ठेकेदार पैसे न मिळाल्याचा कांगावा करत होता. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी ठेकेदाराला फैलावर घेताच त्यांनी व्हाऊचरवर वेळोवेळी दहा लाख रुपये घेतल्याचे कबूल केले. महिलेला लेखी नोटरी करून दिली आहे.
शिरूर पंचायत समिती बीओटी प्रकल्पातील ठेकेदार गाळा नावावर करू देत नसल्याने महिला उपोषणास बसून दि. १५ ऑगस्ट दिनी आपल्या कुटुंबीयांसोबत त्याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार होती.
प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत ठेकेदाराला बोलावून लेखी आश्वासन दिल्याने पुढील अनर्थ टळला आहे. शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण सोडण्यात आले आहे.
पंचायत समिती व बीओटी प्रकल्पातील गाळाकरीता दहा लाख रुपये देऊनही गाळा नावावर होत नसल्याने व ठेकेदाराची मनमानी व दडपशाहीला कंटाळून शिरूर येथील हॉटेल व्यावसायिक महिला सीमा गिरमकर यांनी शिरूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता.
याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके, मे. महिंद्रा रिअलटर्स इन्फ्रा यांचे प्रतिनिधी हिमांशू शहा व मनोज छावछरीया व उपोषणकर्ते यांचे पती राहुल गिरमकर, दत्तात्रय पठारे, उपअभियंता व अनिल गावडे, शाखा अभियंता,
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, निलेश वाळुंज, रामा झेंडे, राणीताई कर्डिले, गीताराणी आढाव, शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, उषाताई वाखारे, प्रितेश फुलडाळीया, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
झेडपीच्या सूचनेनंतर रजिस्टर
शिरूर पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात आला. महिलेने राहिलेले १ लाख ७८ हजार रुपये जमा करून जिल्हा परिषद ज्यावेळेस या गाळ्याचे रजिस्टर करायला सांगेल. त्या दिवशी महिलेला गाळा नावावर करून देणार असल्याचे ठेकेदाराने लेखी दिल्याने हे उपोषण महिलेने मागे घेतले आहे.





