शिरूर: पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक

शिरूर- शिरूर तालुक्यातील करडे गावात पैशाच्या वादातून पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दीपक संपत नवले (वय २३ , रा. करडे, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता दीपकने महेश रोडे याच्यावर प्लॉटिंग व्यवहारातील वादातून पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, राजू मोमीन आणि संजू जाधव यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे करडे गावात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तपासात दीपकने गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईने गावातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसला आहे. जप्त शस्त्रांचा तपास सुरू असून, पुढील कारवाई शिरूर पोलीस करत आहेत.





