Shirur: शिरूर तालुक्यात अनधिकृत पद्धतीने नवजात बालिकेला दत्तक दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२३ रोजी शिरूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज क्र. ११२/२०२३ नुसार दत्तकपत्राची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया करताना बाल न्याय अधिनियमांतर्गत आवश्यक असलेली वैधानिक आणि अधिकृत दत्तक प्रक्रिया पूर्णपणे पाळण्यात आलेली नव्हती. संबंधित नवजात बालिकेला कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता थेट दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यात आल्याचा आरोप आहे. हेही वाचा – कवठे येमाईत एकाच घटनेचे दोन पैलू; मारहाण व विनयभंगाच्या परस्पर तक्रारींनी प्रकरण तापले विशेष म्हणजे, हा प्रकार सुमारे तीन वर्षांनंतर उघडकीस आला असून, १३ एप्रिल २०२६ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम ८० नुसार, अधिकृत प्रक्रिया न पाळता मुलांचे दत्तक देणे किंवा घेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करत असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे दत्तक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.