शिरूर: तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तब्बल १२९ रस्ते केले खुले

शिरूर – शिरुर तालुक्यातील बऱ्यापैकी लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. डिंभा धरण व चासकमान धरणामुळे शेतीला बारमाही पाणी मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यासाठी वाद होऊ लागले आहेत. तसेच कृषी आणि तत्सम क्षेत्रात कमी होत चाललेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण हा शेती क्षेत्रासाठी एक अपरिहार्य मुद्दा बनला आहे.
आजच्या यांत्रिकीकरणांमध्ये शेतीमध्ये विविध कामे जसे की, पेरणी, पाळी, नांगरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत आहेत. शेतीमाल विक्रीसाठी बाजारात पोहचविण्याकरीता तसेच विविध यंत्रसामुग्री शेतीकामासाठी शेतीपर्यंत पोहचण्यासाठी शेतीला सर्वऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते.
यामुळे शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते व पाऊल रस्ते इत्यादी रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता उपयोगात येत असतात. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यासाठी शेजारील शेतकरी रस्ता देत नाही. किंवा रस्त्यावर अतिक्रमण केलेले असते. शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तक्रारी वाढत चालल्या असून शेतमाल बाहेर काढण्यासाठी, पानंद रस्ते खुले करण्यासाठी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिरुर तहसिलदार यांच्याकडे रस्ता मागणीचे अर्ज केले होते.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत शिरुर तालुक्यातील नवीन रस्ते, रस्ते खुले करणे, पाणंद रस्ते, शिव रस्ते असे एकुण तब्बल १२९ रस्ते शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आजपर्यंत खुले केले आहे. व अजूनही रस्त्याच्या बाबतीत आलेल्या अर्जाची दखल घेत प्राधान्याने शेत रस्ते खुले करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.
शेत रस्ता मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा ?
शेतात जाण्यासाठी रस्ता असणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो. ज्या भूमापन क्रमांकाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवायचा आहे, असा भूमापन क्रमांक ज्या महसूल क्षेत्रात येतो त्या तालुक्याच्या तहसीलदाराच्या नावे तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात अर्ज करावा. – बाळासाहेब म्हस्के (तहसीलदार, शिरुर)





