Shirur : टाकळी हाजीत शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाकडून मारहाणीचा आरोप; चौकशी सुरू
Shirur : टाकळी हाजी पोलीस चौकीत शेतकऱ्याला मारहाण केल्याचा पोलीस उपनिरीक्षकावर आरोप. शेतकऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार; चौकशी सुरू.

Shirur : (जांबुत) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकीत एका शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी शेतकरी रावसाहेब सुखदेव घोडे (रा. टाकळी हाजी) यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
घोडे यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी शेतीच्या वादातून चुलतभावाच्या कुटुंबाशी भांडण झाले होते. दोन्ही बाजूंनी पोलीस चौकीत तक्रारी दिल्या होत्या. मात्र, मध्यस्थीने वाद मिटला होता. त्यानंतर ५ नोव्हेंबरला चौकशीसाठी त्यांना चौकीत बोलावण्यात आले.
तेथे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी कानाखाली मारले, शिवीगाळ केली, मोबाईल हिसकावून घेतला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप घोडे यांनी केला आहे. मारहाणीत डाव्या कानाने कमी ऐकू येत असून जबड्याला सूज आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
चौकीतील सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी आणि वैद्यकीय अहवाल तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या बदली आदेशाचीही पडताळणी करण्याची मागणी आहे. दरम्यान, शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.





