Shirur: राज्यात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४३ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून उष्णतेची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाढत्या उष्माघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. उष्णतेमुळे नागरिकांमध्ये उलट्या, जुलाब, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे तसेच रक्तातील साखरेची पातळी कमी होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या तक्रारीही वाढताना दिसत असल्याने लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेणे आवश्यक असल्याचे पिंपरखेड येथील श्रीराम क्लिनिकचे संचालक डॉ. राम पोखरकर यांनी सांगितले. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळावे. आहारात हलके पदार्थ, लिंबूपाणी, ताक, तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. दिवसातून किमान पाच ते सहा लिटर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.