Shirur Crime News : शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गहाळ झालेले १५ लाख किंमतीचे मोबाईल मूळ मालकांना केले परत; नागरिकांकडून कौतुक

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिलेले होते.
शिरूर पोलीस स्टेशनला गहाळ झालेले मोबाईल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांनी ट्रेसिंगला लावून गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषन करून शोध घेण्याचे काम सुरू केले होते. बहुतांश नागरिक हे एकदा गहाळ झालेल्या मोबाईल फोन परत मिळण्याची आशा सोडून देतात.
मागील चार महिन्यात तब्बल १५,२४,५००/-रूपये किंमतीचे एकूण ५५ मोबाईल फोन ट्रेसिंग करून कनार्टक व महाराष्ट्र राज्यामधील विविध जिल्ह्यांतून परत मिळवण्यात शिरूर पोलीस स्टेशनकडील तपास पथकास यश मिळाले आहे. कनार्टक राज्यामधील मोबाईल फोन शोधून काढतेवेळी हवेरी पोलीस स्टेशन कर्नाटक येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार हनुमंता जनागेरी यांनी मदत केली आहे.
नागरिकांनी व्यक्त केला आनंद
हे आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मूळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असून नागरिकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. सन २०२५ या वर्षामध्ये शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आतापर्यंत गहाळ झालेले १२५ मोबाईल फोन शोधून मुळ मालकांचे स्वाधीन केलेले आहेत.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, पवन तायडे, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांचे पोलीस पथकाने केली आहे. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळणे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, शिरूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या सेवाभाव व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





