शिरूर: ‘हरित महाराष्ट्र’ संकल्पनेला चालना देण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन, पुणे (ग्रामीण) यांच्या वतीने ‘एक पाऊल पुढे’ अभियानांतर्गत शिरूर बसस्थानकाजवळील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘श्रीविश्वक फाउंडेशन’ने यासाठी ७० झाडे उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शिरूर पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी ‘माझं झाड, माझं कर्तव्य’ या घोषवाक्याखाली सहभागी झाले. प्रत्येकाने एक झाड लावले आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली. एकूण ७० झाडे कर्मचाऱ्यांना दत्तक देण्यात आली. हा उपक्रम निसर्ग संरक्षण, पर्यावरण संतुलन आणि हरित शिरूरच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. शिरूर पोलीस स्टेशनच्या या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हा उपक्रम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.