शिरूर : शिरूर शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अरबाज हमीद शेख (वय १९, रा. मोठी मशीद समोर, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम MH-16-DG-5597 क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिओ पेट्रोल पंप परिसरात येणार आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तत्काळ सापळा रचत स्विफ्ट गाडीची झडती घेतली असता, गोवा 1000 पान मसाला व अन्य तंबाखूजन्य पदार्थ असा ५२,५०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सापडला, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. एकूण कारवाईत ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अरबाज शेख याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत. शिरूर शहरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेला ही कारवाई मोठे यश ठरत आहे.