शिरुर पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई: पेट्रोल पंपावरील ९४ हजारांच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत

शिरुर : शिरुर तालुक्यातील निमोणे येथील एच. पी. पेट्रोल पंपावरील तब्बल ९४ हजार ५२० रुपयांच्या रोकड चोरीप्रकरणी शिरुर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असून त्याला येरवडा येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.
या प्रकरणी पेट्रोल पंपावरील कामगार रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा. देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश, सध्या साखोडा ता. मोरबी, जि. राजकोट, गुजरात) याने साथीदारासह रोकड चोरल्याची फिर्याद शिरुर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत होते.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, आरोपी गोंड हा गुजरातमधील साखोडा येथे काम करत असल्याचे समोर आले. त्यानंतर केंजळे यांनी हवालदार टेंगले, नाथसाहेब जगताप, अजय पाटील यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
तांत्रिक विश्लेषण करून आणि गुजरात पोलिसांच्या मदतीने शिरुर पोलिसांच्या पथकाने मोरबी येथे जाऊन आरोपी रामेश्वर गोंड याला ताब्यात घेतले. त्याला दि. १८ ऑगस्ट रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळ, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अटक मोहिमेत हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप, अंमलदार विजय शिंदे व अजय पाटील यांनी सहभाग घेतला.





