शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत रंगतदार झाली असून प्रत्येक पक्षांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे. आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रचार जोमात सुरू असून तरुण, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या एका उमेदवाराने दोन वेळा उपनगराध्यक्ष पद भूषवूनही स्वतःच्या प्रभागाचा विकास न केल्याची टीका जनतेतून होत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज समस्या, गटारांच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रभागातील प्रश्न निकाली न लागता असतानाच त्यांनी तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्याने नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. याउलट, ऐश्वर्या पाचर्णे यांच्या प्रचार बैठकींना प्रचंड गर्दी होत असून शहराच्या सर्व भागातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रलंबित कामे, जलव्यवस्था, स्वच्छता, स्मार्ट रस्ते, महिला संरक्षण, क्रीडा-सांस्कृतिक विकास आणि तरुणांसाठी रोजगार संधी यांसारख्या विषयांवर त्यांची ठोस भूमिका असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रचारादरम्यान ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या, “शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव ध्यास आहे. गेल्या काही वर्षांत प्रलंबित राहिलेल्या योजनांना गती देऊन शहराला आधुनिकतेकडे नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” शिरूरच्या राजकारणात नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळावी या मागणीला वेग येत असून पंचरंगी लढतीत ऐश्वर्या पाचर्णे या निर्णायक स्पर्धक ठरत आहेत. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक चुरशीचा होण्याचे संकेत मिळत आहेत.