Shirur News : शिरूरमधील इचकेवाडीत चोरट्यांकडून 2 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची धक्कादायक घटना घडली. ही चोरी १५ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी एकनाथ जालिंदर इचके (वय ५६, रा. खोपोली) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इचके हे मूळचे इचकेवाडीचे रहिवासी असून, नोकरीनिमित्त खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे राहतात. त्यांच्या अनुपस्थितीत इचकेवाडीतील घर बंद होते. चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाट फोडून १ लाख २६ हजारांची रोख रक्कम, ७० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि २५ हजारांचे चांदीचे दागिने व भांडी असा ऐवज चोरला.
घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, शिरूर पोलीस तपास करत आहेत. तसेच पोलिसांनी नागरिकांना बंद घरे आणि मालमत्तेची काळजी घेण्याचे तसेच परगावी राहणाऱ्यांनी शेजाऱ्यांना पूर्वसूचना देण्याचे आवाहन केले आहे.





