शिरूर : शिरूर शहरातील गुजरमळा परिसरात १५ मे २०२५ च्या रात्री ८ वाजल्यापासून १६ मे च्या सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत एका बांधकाम स्थळावरून ६५,००० रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली. यामुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी अमोल बाबाजी एरंडे (वय २९, कॉन्ट्रॅक्टर, रा. बाबुरावनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गुजरमळा येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम प्रकल्पात ठेवलेले त्यांचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्याने चोरले. चोरीला गेलेल्या साहित्यात २३ लोखंडी जॉक्स (२३,००० रुपये), ६ लोखंडी चॅनेल (१८,००० रुपये), ४८ लोखंडी टाय रॉड (१६,००० रुपये) आणि ८ कॉलमसाठी लोखंडी चॅनेल (८,००० रुपये) यांचा समावेश आहे. शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपास पोलीस हवालदार जगताप यांच्याकडे आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता बाळगावी, अशी मागणी होत आहे. लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक केंजळे यांनी व्यक्त केला.