प्रभात वृत्तसेवा टाकळी हाजी – घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याबाबत दैनिक प्रभातने प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच कुकडी पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करत बंधाऱ्याची दुरुस्ती केली आहे. या तत्पर कारवाईमुळे परिसरातील संभाव्य उन्हाळी पाणी टंचाई टळली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी या बंधाऱ्याच्या भिंतींना तडे गेल्याने पाणी वाया जात होते, ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ही बाब दैनिक प्रभातने ठळकपणे मांडल्यानंतर अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर आणि उपविभागीय अधिकारी डी. एस. कोकणे यांनी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे आणि कुकडी प्रकल्प कालवा समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनीही घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.कुकडी पाटबंधारे विभागाने गळती असलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट व अन्य तांत्रिक उपाययोजना करून पाण्याचा अपव्यय थांबवला आहे. यामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळी स्थिर झाली असून, उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दैनिक प्रभात वृत्तपत्र समूहाचे तसेच तत्परतेने काम केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.