Shirur News – शिरूर शहर व ग्रामीण परिसरात सतत होत असलेल्या भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वीजपुरवठ्यातील खंडितपणा कमी करण्यासाठी 13 अतिरिक्त रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे येत्या काळात वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिरूर शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर ‘भूमिपुत्र प्रतिष्ठान’च्या वतीने महावितरणकडे निवेदन देत भारनियमनाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर संस्थेने परिसरात सर्वेक्षण करून समस्येची तीव्रता अधोरेखित केली होती. समस्या मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी शिरूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या अधिकार्यांनी तत्काळ आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी 13 नवीन रोहित्र बसवण्यासह वारंवार वीज खंडित होणार्या भागांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वीजचोरी रोखण्यासाठीही विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. महावितरणकडून मिळालेल्या आश्वासनांमुळे आंदोलकांचे समाधान झाले असून, ‘भूमिपुत्र प्रतिष्ठान’चे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. महावितरणने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने सध्या आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या निर्णयामुळे शिरूरकरांना मोठा दिलासा मिळणार असून, सतत खंडित होणार्या वीजपुरवठ्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.