प्रभात वृत्तसेवा शिरूर – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण (ता. शिरूर) येथे गुरूवारी (दि. २७) ‘माझे अस्तित्व–शक्ती’ एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले असून, परिसरातील एकल महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून या शिबिरात एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, सोयी-सुविधा, कागदपत्रांची पूर्तता आणि आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. कांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच आधार अपडेट, नवीन रेशन कार्ड काढणे, आयुष्यमान भारत कार्ड वितरण आणि कर्करोग पडताळणी यांसारख्या विविध सेवा देण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके म्हणाले की, एकल महिलांपर्यंत शासकीय योजना आणि आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या शिबिराचा उद्देश आहे. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या वतीने ३८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. या शिबिरामुळे महिलांसाठी शासनाचे दरवाजे अधिक सुलभरीत्या उघडल्याबद्दल नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.