निमोणे : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री दारू पिण्याच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत धडाकेबाज कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई येथील सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगाव रासाई) याचा खून झाला. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून आरोपी राहुल दत्ता गव्हांडे (वय २३, मूळ रा. उमरखेड, जि. यवतमाळ, सध्या रा. वडगाव रासाई) याने अविनाश याला हाताने मारहाण करून त्याचे डोके दगडावर आपटले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि हणमंत नकाते यांनी तातडीने तपास पथके स्थापन केली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीच्या हालचालींची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, वडगाव रासाई येथील पाटीलमळा परिसरात सापळा रचून पोलिसांनी राहुल गव्हांडेला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने खुनाची कबुली दिली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हणमंत नकाते, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, नाथसाहेब जगताप, अशोक शिंदे, संपत खबाले, अमोल गवळी, तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, अजय पाटील, अमोल माने, किशोर वाघ, तानाजी बाबर, विजय शिंदे, सचिन भोई, निरज पिसाळ, पवन तायडे, रविंद्र आव्हाड आणि निखील रावडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.