शिरूर : यंदाच्या गणेशोत्सवात शिरूर नगरपरिषदेने राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांनी शहरातील गणेशभक्तांना पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा दाखवली आहे. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती, पथदिव्यांची सुस्थिती, झाडांच्या फांद्या छाटणे आणि विसर्जन घाटांची स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेत शनि मंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट आणि रयत शाळा मैदान येथे कृत्रिम विसर्जन हौद आणि कुंभ उभारले आहेत. निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कलश उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता या कलशांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी सुव्यवस्था राखण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मोफत वाहन सुविधा आणि मूर्ती संकलन उपक्रम शिरूर नगरपरिषद आणि टोफे होम फूड डिलिव्हरी ॲप यांच्या सहकार्याने गणेशभक्तांसाठी घरापासून विसर्जन घाटापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा बुक करण्यासाठी नागरिकांना 9923111161, 7499192196 आणि 7263800707 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, “श्री गणेश मूर्ती संकलन उपक्रम” अंतर्गत स्वयंस्फूर्तीने मूर्ती दान करणाऱ्या भक्तांना “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी नागरिकांना कृत्रिम हौद किंवा मूर्ती संकलन उपक्रमाचा वापर करून नदी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. “नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने विसर्जनावेळी विशेष काळजी घ्यावी. निर्माल्य नदीत न टाकता कलशांमध्ये टाकावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले. शिरूर नगरपरिषदेचे हे उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षित गणेशोत्सवाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले असून, शहरवासीयांनी त्याचे स्वागत केले आहे.