शिरूर : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे मंगळवारी (दि. ४ जून) दुपारी एका किराणा दुकानात घुसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी दुकान चालवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १,५८,४०० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेखा अनिल कुंभार (वय ४६, व्यवसाय – किराणा दुकान, रा. वडगाव रासाई) यांनी याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दुपारी ४:०८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या “शांभवी किराणा दुकान” मध्ये दोन अज्ञात इसम ग्राहक म्हणून आले. त्यापैकी एकाने पाण्याची बाटली मागून सुरेखा यांचे लक्ष विचलित केले. काही क्षणातच या इसमांनी त्यांच्या गळ्यातील १ तोळा ८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण ओढून चोरले आणि घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करत आहेत. यापूर्वी चार दिवसांपूर्वी शिरूर बसस्थानकावर होमगार्ड चंदाबाई यांचे गळ्यातील दागिनेही अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. होमगार्डलाच सुरक्षितता नसेल तर सामान्य प्रवाशांचे काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या दोन्ही घटनांमधील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास तीव्र केला आहे. शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.