शिरूर : शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढण ओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच रुग्णवाहिका यांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडून खडी वर आल्याने खडीवरून दूचाकी वाहन घसरून अपघात होत आहे. तसेच फोर व्हीलर गाड्यांचे टायर या ठिकाणी फुटत आहे. अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक नितीन थोरात यांनी सांगितले की, “एकदा नाही तर दोनदा खड्डे भरले, पण निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे रस्ता उखडला. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे काना डोळा करत आहे.” त्यामुळे ही दुरुस्ती केवळ कागदावरच झाली की काय, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून, शिरूर येथे कामावर असणाऱ्या परंतु पुणे येथे राहणाऱ्या आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.