Shirur News : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या घातक अंमली पदार्थ ‘एमडी’ (मेफेड्रोन) चे सावट आता शिरूर (Shirur News) शहर आणि तालुक्यावर गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ड्रग्ज मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पॉकेट स्केलची एका छोट्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून अवघ्या काही दिवसांत ५० ते ६० इतकी विक्री झाल्याची माहिती समोर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डिजिटल काट्यांची संशयास्पद विक्री शिरूर शहरातील (Shirur News) काही इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून २० ते २५ वयोगटातील तरुणांची अचानक वर्दळ वाढली आहे. हे तरुण मुख्यतः डिजिटल पॉकेट स्केल (पॉकेट वजन काटे) खरेदी करत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. सुरुवातीला ही विक्री सामान्य वाटली, मात्र एकाच प्रकारचे काटे मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागल्याने अनेक व्यापाऱ्यांनाही संशय आला. सामान्यतः सोने-चांदी, दागिने किंवा रत्नांचे अचूक वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे हे काटे आता ड्रग्ज व्यवहारासाठी वापरले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. Shirur News मिलीग्रॅममध्ये चालणारा ‘मौत का कारोबार’ ‘एमडी’ ड्रग्जची विक्री अत्यंत सूक्ष्म प्रमाणात (ग्रॅम आणि मिलीग्रॅममध्ये) होते. या पदार्थाची किंमत लाखोंमध्ये असल्याने अचूक मोजमापासाठी डिजिटल पॉकेट स्केलचा वापर केला जातो. त्यामुळे शिरुरमध्ये अशा काट्यांची अचानक वाढलेली मागणी ही योगायोग नसून, ड्रग्जच्या अवैध जाळ्याचे लक्षण असल्याचे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. पुणे शहरातून ग्रामीण भागात पसरले जाळे सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातून एमडी ड्रग्जचे जाळे (Shirur News) झपाट्याने ग्रामीण भागात पसरत आहे. शिरूर तालुक्यातील काही भागांना ‘सेफ झोन’ म्हणून वापरले जात असल्याचीही चर्चा आहे. बेरोजगार तरुणांना पैशाचे आमिष दाखवून या धंद्यात ओढले जात आहे. यामुळे तालुक्यातील युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालक आणि प्रशासनाने सतर्क राहावे तज्ज्ञांच्या मते, ड्रग्जचे व्यसन सुरुवातीला मित्रांच्या दबावाने किंवा ‘फॅशन’ म्हणून सुरू होते. नंतर ते व्यसन, गुन्हेगारी आणि मानसिक अधःपतनाकडे नेते. पालकांनी आपल्या मुलांकडे खालील गोष्टी आढळल्यास तातडीने लक्ष द्यावे: – संशयास्पद डिजिटल वजन काटे – छोटी प्लास्टिक पॅकेट्स – पांढऱ्या पावडरचे अंश – अचानक वाढलेला खर्च किंवा वेळापत्रकातील बदल पोलीस प्रशासनाकडे मागणी शिरुरमध्ये ड्रग्जच्या वाढत्या व्यवहारामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुरवठादार, टोळ्या आणि मागे असलेल्या मोठ्या माशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.