नारायणगाव : रयत शिक्षण संस्थेच्या मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मनिषा संजय थोरवे यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा खेड (राजगुरूनगर) येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी पार पडला. सोहळ्याचे अध्यक्षपद पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नायकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, भगवान पोखरकर, तनुजाताई घनवट, डाएट पुण्याचे प्राचार्य पी. शेंडकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर, तसेच अमोल पवार, अरुण चांभारे, विजय शिंदे, अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, अनिल राक्षे, सुधीर मुंगसे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनिषा थोरवे यांनी भैरवनाथ विद्यालय, अवसरी खुर्द आणि महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे कार्यरत असताना शालेय उपक्रम, सामाजिक कार्य, पालक-शिक्षक संघटनेतील योगदान, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य, कृतीयुक्त अध्यापन, शाळाबाह्य परीक्षा आणि शिष्यवृत्ती यासारख्या उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास रेटवडे यांनी केले, तर उत्तमराव पोटवडे यांनी आभार मानले.