Shirur News : भांबर्डे येथे नवरात्रोत्सवात माता मळाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर

शिरूर : भांबर्डे (ता. शिरूर) येथे नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी माता मळाई देवीच्या दर्शनासाठी पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली. भाविकांनी मनोभावे माता मळाई देवीचे दर्शन घेतले. या सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी भव्य व्यवस्था केली होती.
उत्सवाची सुरुवात रोज पहाटे पाच वाजता विधिवत पूजेने होते, तर सकाळी आठ वाजता महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न होते. दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी गाव उत्सवमय झाले आहे. देवीभक्तिगीतांचे कार्यक्रम वातावरणाला भक्तिरसात न्हाऊन टाकत आहेत.
समाजकार्यासाठी आयोजित रक्तदान शिबिराला तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशस्विनी कला मंच, पुणे यांच्या वतीने अभिनेत्री गौतमी यांच्या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दररोज ५०० किलो खिचडीचा प्रसाद भाविकांना वाटला जात आहे.
दि. २८ रोजीच्या महाआरतीचे मानकरी मंगलदास बांदल, धरमचंद फुलफगर, एपीआय मनीषा पिंगळे आणि राजेंद्र भटोरा हे होते. हरिकीर्तन, दांडीया, मंगळागौर, होम मिनिस्टर अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. हा नवरात्रोत्सव भांबर्डे गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे केंद्र बनवत असून, हा सोहळा भाविकांच्या मनात कायम स्मरणात राहील.





