जांबुत : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या बेट भागात मागील वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन निष्पाप जीव गमावले आहेत. या साखळी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पूर्ण ताकद लावली असून, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि संशयित बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मोहिमेच्या यशस्वी भागात जांबुत (ता. शिरूर) येथील थोरातवस्ती येथे भागुबाई जाधव या वृद्ध महिलेच्या हल्ल्याच्या घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्यात साडेतीन वर्षीय मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. 20 दिवसांत 11 बिबट्यांवर कारवाई वनविभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील वीस दिवसांत एकूण ११ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहेत, तर एक बिबट्या ठार मारण्यात आला आहे. जेरबंद केलेल्या बिबट्यांना पिंपरखेड येथील विशेष बेस कॅम्पमध्ये हलवण्यात येत असून, तेथे त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार केले जातात. नंतर त्यांना जंगलात सोडले जाणार आहे. पिंपरखेड परिसरात सलग हल्ल्यांचे प्रयत्न पिंपरखेड परिसरात बिबट्याची दहशत थांबण्याचे नाव घेत नाही. रोहन बोंबे या बालकाच्या हल्ल्याच्या घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील आंबेवाडी येथे सकाळी ९ वाजता ऊसतोड करणाऱ्या महिला कामगारावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कामगारांच्या आरड्यामुळे बिबट्या पळाला, पण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी २ वाजता मेंढपाळ भाऊसाहेब ठोंबरे यांच्या घोडीवर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोंबरे यांनी प्रसंगावधान दाखवत जोरदार आरडा ओरड केला, त्यामुळे बिबट्या घाबरून शेजारील उसाच्या शेतात पळून गेला. सायंकाळी ४ वाजता देऊबाई शिंदे या महिला घराच्या अंगणात जनावरांना चारा घालत असताना अवघ्या २० फूट अंतरावरून बिबट्याने डरकाळी फोडली. देऊबाई भयभीत होऊन घरात पळाल्या आणि थोडक्यात जीव वाचला. “मी चारा घालत होते, अचानक डरकाळी ऐकली. पाहते तर बिबट्या डोळ्यांसमोर! मी घरात धाव घेतली,” असे देऊबाईंनी सांगितले. वनविभागाची तात्काळ कारवाई या तीनही घटनांची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ पिंजरे लावले, गस्त वाढवली आणि रात्रंदिन पाहणी सुरू केली. सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. पण स्थानिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा एकटे फिरू नये, जनावरांना रात्री घरात बांधावे, आणि बिबट्या दिसला तर आरडा ओरड करावा,” असे आवाहन श्रीमती राजहंस यांनी केले.