Shirur News : शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती

शिरूर : शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आज (दि. १८ सप्टेंबर २०२५) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. यापूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे दोन महिन्यांपासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. शिरूरचे माजी सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नतीनंतर बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
हरिश्चंद्र कांबळे हे अनुभवी अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी राजगुरुनगर, उस्मानाबाद आणि अहिल्यानगर येथे सहायक निबंधक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या सहकार क्षेत्रातील व्यापक अनुभवामुळे शिरूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज पदभार स्वीकारताना कांबळे यांनी देविदास मिसाळ यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी सहकार विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत हार्दिक शुभेच्छा दिल्या. या समारंभाला सहकार विभागाचे अधिकारी दीपक वराळ, पोपट हराळ, प्रशांत पिसाळ, आप्पासाहेब धायगुडे, काजल थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कांबळे यांच्या नियुक्तीमुळे शिरूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल आणि सहकारी संस्थांना अधिक प्रभावी मार्गदर्शन लाभेल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.





