Shirur News : मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे 17 मे 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रस्त्यावर रोहीदास थोरात यांच्या घराजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
अपघातात सागर संभाजी कोळपे (वय २८, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय १२, सध्या रा. मांडवगण फराटा, मूळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल बीरा कोळपे गंभीर जखमी झाले. फिर्यादी दादा बाळासो कोळपे (वय ३८, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांच्या तक्रारीनुसार, डंपर (क्रमांक MH 42 SEQ 7696) च्या अज्ञात चालकाने बेफिकीरपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत रॉंग साईडने पीकअप (क्रमांक MH 03 OE 0638) ला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३४१/२०२५ अंतर्गत IPC कलम २७९, ३०४(अ), ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते करत आहेत.





