निमोणे : शिरूर तालुक्यातील करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत माजी सैनिकाची पत्नी रेश्मा राहुल वाळके (वय ३७) यांना बनावट कागदपत्रांद्वारे भागीदारीतून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आले. या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी रेश्मा वाळके यांनी शिरूर पोलीस ठाण्यात २७ जानेवारी २०२५ रोजी चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून संभाजी वाळके आणि त्यांची मुलगी प्रियांका वाळके यांचा जामीन फेटाळण्यात आला. रेश्मा वाळके यांनी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १९ मार्च २०२५ रोजी मुख्य आरोपी सचिन संभाजी वाळके याला अटक झाली. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी आणि २ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिरूर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता, परंतु संभाजी आणि प्रियांका वाळके यांचा जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज फेटाळला गेला. शिरूर पोलिसांचा सखोल तपास, आरोपींचा जामीन नामंजूर या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे होता, परंतु नंतर तो पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांचा कोणताही दबाव न स्वीकारता सखोल तपास करून सत्य बाहेर आणले, ज्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. रेश्मा वाळके यांनी ‘दै. प्रभात’शी बोलताना सांगितले की, सचिन वाळके याचा जामीन चुकीच्या युक्तिवादावर मंजूर झाला असून, त्याने शिरूर न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग केला आहे. त्या सचिनच्या जामिनाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. संभाजी वाळके यांनी खोटे पॅनकार्ड सादर करून वय ६८ असल्याचे भासवले, परंतु रेश्मा यांनी खरे पॅनकार्ड सादर करून त्यांचे वय ४८ असल्याचे सिद्ध केले. कंपनी ॲक्टचा गैरवापर करून रेश्मा यांच्या खोट्या सह्या करून राजीनामा घेण्यात आला, तसेच सचिन वाळके याने कंपनीच्या खात्यातून लाखो रुपयांचा अपहार केला. या प्रकरणातील सीए आणि सीएस यांच्या अटकेसह रेश्मा यांना पूर्ण न्याय मिळणे बाकी आहे. ॲड. आनंद भगत, फिर्यादीचे वकील