प्रभात वृत्तसेवा शिरूर – तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख आणि पोलीस प्रशासनाकडून मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावर झालेल्या कथित अन्याय-अत्याचार व प्रलंबित प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, (दि. १५) पासून शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत महाधरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्था व राष्ट्रीय स्मारक समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पीडित नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन आल्हाट यांनी केले असून प्राप्त तक्रारींच्या आधारे प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये किसन सखाराम काकडे यांच्या मालमत्तेतील हेराफेरीची चौकशी करणे, बाळासाहेब खंडू जाधव यांच्या जमिनीची चुकीची फाळणी व नोंदी रद्द करून सातबारा दुरुस्त करणे, तसेच माजी सैनिक साहेबराव भागुजी जाधव यांच्या शासकीय जमिनीतील बेकायदा नोंदींची तपासणी करून दोषींवर कारवाई करणे यांचा समावेश आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाला खंडू गंगणे, सतीश तागड, दादाभाऊ लोखंडे, नीलेश पवार, एजाज बागवान, शहाजी जाधव, लालासाहेब वाघचौरे, सोमनाथ परदेशी तसेच निळं वादळ सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष दिपिका भालेराव यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.