शिरूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शिरूर नगरपरिषदेने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय पावले उचलली आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहरातील शासकीय मुलींच्या वसतीगृह परिसरात वृक्षारोपणाचा एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बांबू, चिंच, कौठ, चिक्कू, जांभूळ यांसारख्या पर्यावरणपूरक २३७ झाडांचे रोपण करण्यात आले. याचबरोबर, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ आणि माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत आयोजित ‘वेस्ट टू वंडर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांना टायर, प्लास्टिक बाटल्या, दोरी, पुठ्ठा, लाकूड यांसारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक कलाकृती आणि देखावे साकारण्याची संधी देण्यात आली होती. शहरातील सात शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रथम तीन विजेत्या शाळांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, तर उर्वरित सहभागी शाळांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा सक्रिय होती. शासकीय मुलींच्या वसतीगृहाच्या अधीक्षक वैशाली सटाले, आर. एम. डी. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, तसेच शिरूर नगरपालिका शाळा क्र. १, ३ व ६, जीवन विकास मंदिर आणि व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, कर निरीक्षक माधव गाजरे, नगररचना सहाय्यक पंकज काकड, सहायक कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे व शितल काळे, लेखापाल अंकुश इचके, अंतर्गत लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, विद्युत अभियंता तेजस शिंदे, स्थापत्य अभियंता शामली लाड, भूषण कडेकर, चंद्रकांत पठारे, अनिल चव्हाण, मिठ्ठू गावडे, शहर समन्वयक प्राची वाखारे, प्रभारी स्वच्छता मुकादम मनोज आहिरे, किरण जाधव, गणेश शेंडगे, मनोज शेळके, रामशरण आडोळे, महेश लोळगे, स्वप्नील तरटे, सागर बडगुजर, गौरव कुलथे आणि नीता जाधव यांचा सहभाग उल्लेखनीय होता. नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले. वृक्षारोपण आणि ‘वेस्ट टू वंडर’ सारख्या उपक्रमांद्वारे शिरूर नगरपरिषदेने पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे. या उपक्रमांमुळे शहरात स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होत असून, शिरूर शहर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे.