शिरूर : दि. ६ – शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा अभूतपूर्व राजकीय समीकरणांमुळे वातावरण तापले असून, महायुतीमधील उभी फूट, महाविकास आघाडीचे ऐक्य, उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल यांची गैरहजेरी आणि प्रभागनिहाय बहुकोनी लढतींमुळे निकालाचा अंदाज लावणे अत्यंत धूसर झाले आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत राजकीय अंदाज रंगत असले तरी कोणाही पक्षाला सरस ठरवणे कठीण झाले आहे. ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी यंदा पंचरंगी लढत झाली. ऐश्वर्या अभिजित पाचर्णे (राष्ट्रवादी), अलका सुरेश खांडरे (शरदचंद्र पवार गट), सुवर्णा राजेंद्र लोळगे (भाजपा), रोहिणी किरण बनकर (शिवसेना) आणि वैशाली दादाभाऊ वाखारे (अपक्ष) यांच्यात थेट लढत झाली. या पंचरंगी लढतीमुळे मतांचे मोठे विभाजन होण्याची शक्यता असून, याचा परिणाम अंतिम निकालावर निर्णायक ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती एकदिलाने राहील अशी अपेक्षा असताना, नगरपरिषद निवडणुकीत मात्र चित्र उलटे झाले. राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करून थेट कोंडी निर्माण केली आहे. महायुतीमधील या उघड फुटीमुळे मतांमध्ये तुकडे पडणार असून, या अंतर्गत नाराजीचा परिणाम निकालावर होणार आहे. शिरूरच्या राजकारणावर प्रभाव असणारे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी यंदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पहिल्यांदाच सर्व पक्षांना स्वतःचा दम दाखवण्याची संधी मिळाली आहे. धारीवालांच्या प्रभावाशिवाय मतदारांचा कल कुणाकडे जाईल, हे सांगणे अधिकच अवघड झाले आहे. शहरात ७१.१४% मतदान नोंदल्याने मतदारांचा उत्साह स्पष्ट दिसून आला आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी), माजी आमदार अशोक पवार (शरद पवार गट), जयश्री पलांडे, राहुल पाचर्णे, अॅड. धर्मेंद्र खांडरे (भाजपा) या नेत्यांनी प्रचारात आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने हा निकाल केवळ पक्षांचा नसून प्रत्येक नेत्याच्या ताकदी-प्रभावाचेही मोजमाप होणार आहे. महायुतीची फूट आणि पंचरंगी लढतीमुळे शिरूरचा निकाल ‘सस्पेन्स थ्रिलर’प्रमाणे गुंतागुंतीचा झाला असून, निकालाचे रहस्य २१ डिसेंबरला उकलणार आहे. फोटो – सिंहासन