शिरूर – शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी नेत्या अलका सुरेश खांडरे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. दोन वेळा नगरसेविका आणि दोन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या अलका यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांची ओळख सर्वसमावेशक नेतृत्व करणारी संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आहे. स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली तसेच उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल आणि माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक मूलभूत विकासकामे केली. यामध्ये आंबेडकर उद्यानाची उभारणी, शहरसुंदरतेचे उपक्रम, रस्ते, वीज आणि जैविक कचरा व्यवस्थापनासह विविध कामांचा समावेश आहे. कोरोना काळात त्यांनी धैर्याने पुढाकार घेत रुग्णसेवा, गरजूंना अन्नधान्य, मोफत कागदपत्रे आणि अल्पदरातील अपघाती विमे अशा अनेक निस्वार्थ सेवा पुरवल्या. यामुळे त्यांची आपुलकी शिरूरसह पारनेर आणि श्रीगोदा तालुक्यातील नागरिकांच्या मनात निर्माण झाली. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा विश्वास, मजबूत कामाचा पाया आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे अलका खांडरे यांची नगराध्यक्षपदाची लढत आता संपूर्ण शिरूरचे लक्ष वेधून घेत आहे.