Shirur: राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून ठप्प असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्व्हर मेंटेनन्सच्या कारणामुळे पोर्टल बंद असल्याची माहिती समोर आली असून, ते नेमके कधी सुरळीत होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मिळालेल्या माहितीनुसार, महा-ऑनलाईनसह विविध शासकीय पोर्टल्स ठप्प असल्याने उत्पन्न, रहिवासी, डोमिसाईल, जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, तातडीची कामे प्रलंबित राहिल्याने विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, संबंधित तांत्रिक पथकाकडून समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पोर्टल लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते कधी पूर्ववत होईल याबाबत निश्चित कालमर्यादा देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, तसेच लवकरच सर्व्हर सुरू होऊन प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी व्यक्त केला. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या अशा तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या ऑनलाईन सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.