निमोणे – शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात पिंपळसुटी येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन रक्षा अजय निकम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली असुन चिमुकलीला तिच्या आई समोरच बिबट्याने या चिमुरडीला फरफटत नेले. त्यानंतर दोन तासानंतर या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात आत्तापर्यंत तिसऱ्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मुलीचा मृतदेह पाहतात मुलीचे आई-वडील व नातेवाईकांनी टाहो फोडल्याने परिसरातील महिला नागरिक गहिवरले होते. दरम्यान, यापूर्वी मांडवगण फराटा याठिकाणी १५ नोव्हेंबर रोजी शिवतेज टेंभेकर या पाच वर्षे मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आई समोरच चिमुकलीला बिबट्याने फरफटत नेले पिंपळसुटी येथे नदीच्या कडेला दशक्रिया घाटाजवळ राहणाऱ्या निकम यांची चार वर्षाची मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळेस लाईट गेल्याने तिची आई दुसऱ्या मुलाला जेऊ घालत असताना अचानक आई समोरच बिबट्याने हल्ला करत चिमुरडीला शेतामध्ये फरफटत नेले. आईने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या तिला ओढत लांब घेऊन गेला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जमा झाले. त्यानंतर मुलीचा शोध घेत असताना वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन येऊन मुलीचा शोध सुरु केला. जवळपास दोन ते अडीच तासाने चिमुरडीचा मृतदेह आढळला आहे. वन खात्याच्या वतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. शिरुरच्या पुर्व भागातील तिसरी दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील पूर्व भागात या अगोदर मांडवगण फराटा येथे दोन लहान मुलांना नातेवाईकांसमोर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे. त्यानंतर पुर्व भागातील हि तिसरी दुर्दैवी घटना आहे. त्यात या चार वर्षीय लहान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अगोदर मांडवगण-वडगाव रासाई परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वीस पिंजरे लावले होते. त्यात मांडवगण फराटा-वडगाव रासाई परिसरात दोन तर रांजणगाव सांडस परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. भय इथले संपत नाही मांडवगण फराटा परिसरात रोज बिबट्याचा वावर असुन गेल्या आठ दिवसापुर्वी एका व्यक्तीच्या पाठीमागे बिबट्या लागला होता. तर दोन पशुधनाचा बळीही त्याने घेतला होता. तसेच मांडवगण फराटा येथे दोन मुलांचा जीव घेणाऱ्या नरभक्ष बिबट्यानेच तर हा हल्ला केला तर नाही ना अशी शंका वन विभागाला आहे. तसेच आसपासचे नागरीकही या घटनेमुळे भयभीत झालेले आहेत. वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी शिरुर तालुक्यातील पुर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असुन, मांडवगण फराटा नंतर पिंपळसुटी या गावात नरभक्षक बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात रक्षा निकम या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिक व शाळकरी मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी केली आहे.