जांबूत – राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षातील फाटाफुटीमुळे उमेदवारी निश्चितीचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर उभे ठाकले असून, या गटातील राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत शिरूर तालुक्यातील अनेक इच्छुकांनी आयोजित केलेल्या आखाड पार्ट्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. विशेषत: टाकळी हाजी-कवठे येमाई गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी आयोजित केलेल्या आखाड पार्टीनं लक्ष वेधलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय पाहता राजेंद्र गावडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य अरुणा घोडे यांचे पती दामू घोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) कडून इच्छुक आहेत. तसेच, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे हे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे समर्थक म्हणून इच्छुक असले, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाजी आढळराव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने गावडे आणि पोकळे यांच्यातील राजकीय समीकरणांची चर्चा जोरात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि इच्छुकांची गर्दी – गेली पन्नास वर्षे टाकळी हाजी-कवठे येमाई हा जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (अजित पवार गट) बालेकिल्ला मानला जातो. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार पोपटराव गावडे यांचे या गटावर वर्चस्व आहे. मात्र, यंदा इच्छुकांची संख्या पाहता स्पर्धा तीव्र आहे. कवठे येमाईचे उद्योजक बाळासाहेब डांगे, शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर (माऊली) ढोमे आणि भाजपचे नेते सावित्रा थोरात हे देखील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठी दामोधर दाभाडे, राहुल जगताप, माजी सदस्य वासुदेव जोरी, बाबाजी निचित, सागर दंडवते, माजी सरपंच योगेश थोरात, दीपक रत्नपारखी आणि वसंतराव पडवळ यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवारांचा जनसंपर्क आणि विकासकामांचा डंका – इच्छुकांनी गाठीभेटी, वाढदिवस, विवाहसोहळे, दशक्रिया विधी यांसारख्या कार्यक्रमांना उपस्थिती वाढवली आहे. राजेंद्र गावडे यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गटात निधी आणण्याचे प्रयत्न तीव्र केले असून, माजी आमदार पोपटराव गावडे, स्व. सोनभाऊ गावडे आणि सुनिता गावडे यांच्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी संघटन बांधणी सुरू केली आहे. दामू घोडे, अरुणा घोडे, डॉ. सुभाष पोकळे, सावित्रा थोरात आणि माऊली ढोमे यांनीही मागील दहा वर्षांत जनतेशी जवळीक साधली आहे. या गटात येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार, याची उत्सुकता सर्वत्र आहे. रणधुमाळीला सुरुवात या गटातील राजकीय चुरस आणि पक्षांतर्गत बदलांमुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. उमेदवारांच्या मोर्चेबांधणीने गटातील राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या काळात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.