Shirur : शिंदोडीत रात्री दिसली ‘ड्रोन’सदृश्य वस्तू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Shirur : शिरुर तालुक्यातील शिंदोडी गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोनसदृश्य संशयास्पद वस्तू फिरत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shirur : शिरुर तालुक्यातील शिंदोडी गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोनसदृश्य संशयास्पद वस्तू फिरत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आकाशात चमकणारे दिवे आणि सतत फिरणाऱ्या या वस्तूबाबत गावात विविध चर्चांना उधाण आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान ही वस्तू गाव परिसरासह शेतजमिनींच्या वरून फिरताना दिसत आहे. काही नागरिकांनी या वस्तूचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा दावा केला आहे. मात्र, संबंधित वस्तू अधिकृत ड्रोन आहे की अन्य काही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ग्रामीण भागात रात्रीच्या अंधारात अशा प्रकारची संशयास्पद वस्तू फिरत असल्याने शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काही ग्रामस्थांनी चोरी, रेकी किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी ड्रोनचा वापर होत असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, गावातील काही युवकांनी संबंधित वस्तूचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता ती अचानक दिशा बदलून दूर निघून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गूढ वस्तूबाबतचा संभ्रम अधिकच वाढला असून, गावात दिवसभर या विषयाची चर्चा रंगत आहे. प्रशासनाने तातडीने तपास करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





