Shirur: शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सन २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ३० ऑगस्ट २०२२ पासून जोरी सरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र, सादर करण्यात आलेल्या अर्जात त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. सदस्यांचा विश्वास न ठेवता मनमानी कारभार करणे, तसेच गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे सुचारू प्रशासन राखण्यासाठी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ नुसार विशेष सभा बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या अर्जावर गोरक्ष गाजरे, सुप्रिया जगताप, दिपाली दुंडे, राणी बोऱ्हाडे, राहुल जगताप, सुभाष जगताप, पोपटलाल फिरोदिया आणि रेखा खुपटे या आठ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, तहसील प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असून, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.