Shirur : शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय गायकवाड यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जवळपास सहा वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा निकाल दिला. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणात दत्तात्रय गायकवाड यांच्यावर पत्नी सारिका गायकवाड हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळा कापून खून केल्याचा गंभीर आरोप होता. घटनेनंतर आरोपी स्वतः शिरूर पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्या वेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, आरोपी हाच गुन्हेगार आहे हे ‘वाजवी शंकेपलीकडे’ सिद्ध करणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी उभी करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, फौजदारी खटल्यात दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे ठोस आणि निर्विवाद असणे आवश्यक असते. या प्रकरणात सादर केलेले पुरावे त्या कसोटीवर खरे उतरले नाहीत. परिणामी, संशयाचा फायदा देत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या बचावासाठी अॅड. जयसिंग पडवळ, अॅड. उदय सरोदे आणि अॅड. अभिषेक बाफणा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी तपासातील त्रुटी, पुराव्यांमधील विसंगती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांतील अपूर्णता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाच्या युक्तिवादाला मान्यता देत निकाल दिला. निकालानंतर अॅड. उदय सरोदे यांनी सांगितले की, “न्यायालयाने सर्व पुरावे आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून हा निर्णय दिला आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक निरपराध व्यक्तीस न्याय मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.” या निकालामुळे शिरूर परिसरात या चर्चित खटल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली असून न्यायालयीन प्रक्रियेत भक्कम व सुसंगत पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.